Nashik Politics | उद्धव-आदित्य ठाकरे यांना खुले पत्र – ‘सह्याद्रीचा माथा’ असलेलं नाशिक आज दुर्लक्षित का?’

Nashik Politics | Open letter to Uddhav-Aditya Thackeray – Why is Nashik, the ‘head of the Sahyadris’, neglected today?

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचा आवाज क्षीण; नेतृत्वाकडे नाराजीचं जाहीर आवाहन

नाशिक

उद्धवसाहेब, आदित्यजी,
सप्रेम नमस्कार.

Nashik Politics – बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांनी नाशिकचा उल्लेख ‘शिवसेनेचा बालेकिल्ला’ म्हणून अभिमानाने केला होता. पण आज या बालेकिल्ल्यातील शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भगवे झेंडे फडफडतात, पण ते आता सत्तेच्या राजकीय खेळीचे प्रतीक झालेत.

शिवसेना नाशिकमध्ये भरकटली?

नाशिकमधील परिस्थिती चायना गेट चित्रपटातील वयोवृद्ध लढवय्यांसारखी झाली आहे – जुनी नावं, जुनी शौर्यगाथा, पण कोणी विचारत नाही. नेतृत्वाचा संवाद नाही, कार्यकर्त्यांची हकालपट्टी सोशल मीडियावर, आणि कार्यकर्त्यांना गमावण्याच्या वेदनाही दिसून येत नाहीत.

“ज्यांना जायचं, त्यांनी जावं” – ही भूमिका शिवसेनेला पोखरत आहे. कार्यकर्ते पक्षाचं हृदय असतात; तेच गेल्यावर संघटनाचं रक्तसंचार थांबतो. याउलट, भाजप आपल्या घरात भरती सुरूच ठेवतो.

राजकीय दुर्लक्ष आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ (Nashik Politics)

नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा प्रभाव एकेकाळी निर्णायक होता. पण आज विकासाचं चित्र अस्पष्ट आहे. फक्त कुंभमेळा निधीपुरताच विकास मर्यादित वाटतोय.
“विचारांची शिवसेना” म्हणणाऱ्या पक्षात ना विचार उरलेत, ना कृती. रिकाम्या खुर्च्या आणि डोळे मिटलेलं नेतृत्व – हीच ओळख बनत चालली आहे.

नाशिक पुन्हा आवाज देतोय – नेतृत्व कृतीत दिसावं

नाशिक शिवसेनेची ही अवस्था थांबवायची असेल, तर तुम्हालाच पुढे यावं लागेल. फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून नाही, तर रस्त्यावर उतरून कार्यकर्त्याच्या खांद्यावर विश्वास टाकून. नाहीतर इतिहास म्हणेल – “बाळासाहेब गेले, आणि पाठोपाठ बालेकिल्लाही गेला.”

आदित्य ठाकरे यांना विशेष संदेश

वटवृक्ष वाचवणारे तुम्ही, पण आज पक्षाची मुळेच उन्मळून पडत आहेत. सभा घेणं, सोशल मीडियावर मुद्दे मांडणं महत्त्वाचं आहे, पण राजकारण ही प्रतिमेची नाही, तर जमिनीवरच्या लढाईची गोष्ट आहे.

जर तुम्ही खरोखर पुढचं नेतृत्व घेणार असाल, तर शब्दांपेक्षा कृतीत ‘युवा नेता’ सिद्ध करावं लागेल.