नाशिक : Govt Office Birthday Ban आता शासकीय कार्यालयांमध्ये केक कापणे, वाढदिवस साजरा करणे, फोटोसेशन किंवा सोशल मीडियासाठी रील्स तयार करणे हा प्रकार कर्मचाऱ्यांना चांगलाच महागात पडणार आहे. राज्य शासनाने यावर कठोर भूमिका घेत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 अंतर्गत ताजं परिपत्रक जारी केले आहे.
शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, कार्यालयीन वेळेत किंवा कार्यालयीन परिसरात कोणताही वैयक्तिक समारंभ करणे म्हणजे शिस्तभंग, आणि अशा प्रकारांवर आता थेट प्रशासकीय चौकशी, पदोन्नती रोखणे, निलंबन किंवा सेवा समाप्तीसारखी कडक कारवाई केली जाऊ शकते.
वाढदिवस, सेल्फी, समोसे… आता सगळं बंद! (Govt Office Birthday Ban)
काही कार्यालयांमध्ये काम थांबवून केक-कटिंग, स्नॅक्स पार्टी, म्युझिक आणि रील्स शूटिंग हे प्रकार सर्रासपणे चालत होते. यामुळे नागरिकांची कामं खोळंबत होती आणि सरकारी संसाधनांचा वापर चुकीच्या पद्धतीने होत होता. शासनाच्या म्हणण्यानुसार, कार्यालयीन वेळ ही लोकसेवेसाठी आहे, वैयक्तिक सोहळ्यांसाठी नाही.
काय आहे परिपत्रकातील प्रमुख मुद्दे?
शासकीय कार्यालयात वाढदिवस, निरोप वा गौरव समारंभ घेण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक.
कार्यालयीन वेळेत कोणताही वैयक्तिक समारंभ करणे नियमबाह्य.
कर्मचाऱ्यांवर वर्गणीसाठी दबाव टाकण्यास सक्त मनाई.
नियम उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई शक्य.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या सूचना
शासनाने सर्व विभाग प्रमुखांना अशा घटनांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय कार्यालय ही लोकसेवेची जागा असून ती वैयक्तिक सेलिब्रेशनसाठी वापरली जाणार नाही, याची काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.