नाशिकरोड (Gosaviwadi) | Maut Ka Kuwa Nashik– नाशिकरोडच्या गोसावीवाडी परिसरात रस्त्यालगत असलेला सुमारे ८० ते ९० फूट खोल खड्डा गेली तीन वर्षे खुला अवस्थेत असल्याने स्थानीय रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या खड्ड्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव, प्राण्यांचा मृत्यू, आणि आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.
बांधकाम व्यावसायिकांचा बेफिकीरपणा
हा खड्डा एका बांधकाम व्यावसायिकाने इमारत बांधण्यासाठी खोदलेला आहे. मात्र, त्यास कोणतेही सुरक्षा कठडे किंवा संरक्षक जाळी नसल्यामुळे शाळकरी मुलं आणि लहान बालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
घरांच्या भिंतींना धक्का, आरोग्यावर परिणाम (Maut Ka Kuwa Nashik)
या खड्ड्यालगतची घरे खचू लागली आहेत. खड्ड्यात पाणी साचल्याने डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांचा धोका वाढला आहे. अनेक प्राण्यांचे मृतदेहही येथे आढळले आहेत, जे आरोग्य विभागासाठी गंभीर इशारा आहे.
नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया | महापालिकेवर निष्क्रीयतेचा आरोप
स्थानिक रहिवासी अशोक कोरडे यांनी सांगितले की, “महापालिकेला अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आता आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत.” सजित शेख यांनीही प्रशासनाच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली.
बांधकाम नियमांचे उल्लंघन
नगररचना विभागाच्या नियमानुसार ३१ अटी व शर्ती घालून बांधकाम परवानगी दिली जाते. त्यातील अट क्रमांक ३१ अंतर्गत, ‘ऑल सेफ्टी मेजर्स ऑन साईट’ ही जबाबदारी बांधकाम व्यावसायिकाची असते. मात्र गोसावीवाडीत याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट आहे.
प्रशासनाची भूमिका आणि कारवाईची तयारी
महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जर नाशिकमध्ये अशा प्रकारे खुल्या अवस्थेत खड्डे ठेवलेले आढळले, तर बांधकाम व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई केली जाईल.” शासनाच्या महाराष्ट्र नगररचना कायदा १९६६ आणि कामगार सुरक्षा संहिता २०१८ अंतर्गत कारवाईची तरतूद आहे.