Nashik | प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील महायुतीमध्ये जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिक (Nashik) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी भाजपनेही या जागेवर जोरदार दावा ठोकल्याने महायुतीतील तणाव वाढला आहे.
महायुतीच्या प्राथमिक फॉर्म्युल्यानुसार भाजपला १२, शिवसेना (शिंदे गट) यांना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना २ जागा देण्याचे ठरले होते. मात्र, शिवसेनेकडून ७ जागांची मागणी करण्यात आल्याने जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. नाशिकची (Nashik) जागा मिळवण्यासाठी शिंदे गट आग्रही असून पक्षाने स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दुसरीकडे, ही जागा सोडण्यास भाजप तयार नसल्याची चर्चा असून, गरज पडल्यास स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची तयारी पक्षात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
महायुतीकडे स्पष्ट बहुमत
नाशिक Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण ६१९ सदस्य मतदान करणार आहेत. यामध्ये महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे.
- भाजप – १८८ सदस्य
- शिवसेना (शिंदे गट) – १७१ सदस्य
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १०७ सदस्य
अशा प्रकारे महायुतीकडे एकूण ४६६ सदस्यांचे संख्याबळ आहे.
तर महाविकास आघाडीकडे तुलनेने कमी ताकद असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचे ४५ आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. याशिवाय इस्लाम पार्टीचे ३७, एमआयएमचे २१ तसेच अपक्ष आणि इतर पक्षांचे ३९ सदस्य आहेत.
तिरंगी लढतीची शक्यता
महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास नाशिकमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद वाढल्यास अपक्ष, उद्धव ठाकरे गट, एमआयएम आणि इतर लहान पक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे ही निवडणूक केवळ संख्याबळाची नसून राजकीय रणनीती आणि समीकरणांची कसोटी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.