Sinner Farmer fraud : सोयाबीन खरेदीत १०९ शेतकऱ्यांची ३.८४ कोटींची फसवणूक; सिन्नरमध्ये आठ व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा

siner shetkari faurd

सिन्नर | प्रतिनिधी
तालुक्याच्या पश्चिम भागातील १०९ शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी व्यवहारात तब्बल ३ कोटी ८४ लाख ४ हजार ४८९ रुपयांची फसवणूक ( fraud) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दीपाली ट्रेडिंग कंपनी आणि साक्षी ट्रेडिंग कंपनीच्या प्रमुखांसह आठ व्यापाऱ्यांविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दीपक अशोक वाजे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयितांमध्ये मुकुंदा पंडित चौगुले, पंडित लहानू चौगुले, दीपक पंडित चौगुले, सोमनाथ सुदाम मुठाळ यांच्यासह अन्य चार व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ पासून पांढुर्ली येथील दीपाली ट्रेडिंग कंपनी व साक्षी ट्रेडिंग कंपनीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल विक्री केला होता. संबंधित शेतकरी अनेक वर्षांपासून या व्यापाऱ्यांकडे नियमितपणे सोयाबीन विक्री करत होते.

सुरुवातीच्या काळात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात येत असल्याने त्यांचा विश्वास बसला होता. मात्र, २०१९ नंतर विक्री करण्यात आलेल्या सोयाबीनच्या बदल्यात व्यापाऱ्यांनी केवळ पावत्या दिल्या. त्या पावत्या घेऊन शेतकरी वारंवार पैसे मागण्यासाठी जात होते. मात्र, विविध कारणे सांगून त्यांना टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पैशांसाठी तगादा लावल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी ( fraud)

एप्रिल २०२६ मध्ये सर्व शेतकरी एकत्र येऊन व्यापाऱ्यांकडे थकीत रकमेची मागणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी संबंधित व्यापाऱ्यांनी एवढी मोठी रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगत, पैशांसाठी तगादा लावल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.