MBC मराठी नाशिक: स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयावर वसतिगृह व आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसाठी उलगुलान मोर्चा काढण्यात आला. गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी १ वाजता सुरू झालेला मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत थेट आदिवासी विकास आयुक्तालयावर धडकला. या आंदोलनात एसएफआयने वतीने वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा तसेच घोडेगाव प्रकल्पांर्गत पुणे जिल्ह्यासाठी एकूण ७००० जागा वाढवण्यात आल्या पाहिजे. सेंट्रल किचन पध्दती बंद करा आणि विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्या प्रकरणी संस्थेवर कारवाई करावी,जिल्हास्तरावरील वसतिगृहातील जेवणाची डीबीटी बंद करून पूर्वीप्रमाणे मेस पध्दती सुरु करावी,नवीन शिक्षण धोरणानुसार पदवीचे शिक्षण ४ वर्षाचे झाले असून वसतिगृह प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करून वसतिगृहात ४ वर्षासाठी प्रवेश देण्यात आला पाहिजे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमाचे इयत्ता १ ली ते ५ वीचे वर्ग सुरू करण्यात यावेत. राज्यातील भाडेतत्त्वावर चालणारे वसतिगृहांच्या जागी सरकारी इमारती उभारण्यात यावी. आश्रमशाळा, वसतिगृहामधील मुलभूत सुविधांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात आले पाहिजे. उदा. वसतिगृहात अंघोळीचे गरम पाणी, शिक्षक भरती, व्यायामशाळा, कॅम्पुटर रूम, स्टडी रूम, ग्रंथालय, लाईट, दरवाजे – खिडक्या दुरुस्त करणे, इत्यादी. अश्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी या आंदोलनाला एसएफआयचे राष्ट्रीय महासचिव मयुख बिश्वास, राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले. त्यानंतर प्रशासनासोबत शिष्टमंडळ चर्चेला गेले होते. या शिष्टमंडळात एसएफआयचे राष्ट्रीय महासचिव मयुख बिश्वास, राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष भास्कर म्हसे, राज्य सहसचिव विलास साबळे, राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, राज्य कमिटी सदस्य गीता दौडा, देविलाल बागुल, तसेच वृषाली दाभाडे, दिलीप बोंजे यांचा समावेश होता. जवळपास सव्वा २ तास झालेल्या बैठकीत मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे एसएफआयने जाहीर केले आहे. या आंदोलनात वरील नेतृत्वासह एसएफआयचे राज्य कमिटी सदस्य संदीप मरभळ, संतोष जाधव, नितीन कानल, अंकिता धोडी, रितेश चोपडे, दीपक वालकोळी, राजू शेळके, समीर गारे, निशा साबळे, अक्षय घोडे, अक्षय निर्मळ, सुरेखा बागुल, वृषाली दाभाडे, विलास भील, पवन चिंचाणे, अजय टोपले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.