चिंचवड, २८ सप्टेंबर: चिंचवडमधील एक कोटी आठ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी अक्षत गोयलला अटक करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांना थरारक प्रसंगाचा सामना करावा लागला. आरोपी अक्षत गोयलने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी जखमी झाले असून त्यांच्या पायाला मुका मार लागला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून जयपूर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस चिंचवडमधील एक कोटी आठ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी आरोपी अक्षत गोयलला पकडण्यासाठी राजस्थानमधील जयपूर येथे पोहोचले होते. अक्षतचा साथीदार मयांक गोयल याला आधीच अटक करण्यात आली होती. मयांककडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अक्षतचा शोध घेण्यासाठी सायबर टीमने जयपूरमध्ये सापळा रचला.
सायबर पोलीस अक्षत गोयलला पकडण्यासाठी जयपूरमध्ये पोहोचले, त्यावेळी तो आपल्या मित्रांसह एका काळ्या चारचाकी गाडीत होता. पोलिसांनी गाडीला घेरून त्याला खाली उतरवण्याचा आदेश दिला. मात्र, अक्षतने गाडी सुरू करून पोलिसांना चुकवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी त्यांच्या गाडीसमोर थांबले असताना, अक्षतने थेट त्यांच्यावर गाडी घालून तेथून पलायन केले.
घटनेनंतर प्रवीण स्वामी यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षत गोयलविरुद्ध जयपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस अक्षतच्या शोधात आहेत.