चंद्रपूर, 2 ऑक्टोबर: आदिवासी संस्कृती, भाषा, आणि कला यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे, तसेच आदिवासी समाजाच्या स्थायी प्रगतीसाठी सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण आवश्यक आहे, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. या उद्देशाने राज्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात 17 टक्के आदिवासी लोकसंख्या असल्यामुळे, मुलांच्या शिक्षणासाठी आणखी एका एकलव्य मॉडेल शाळेची निर्मिती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेबद्दल सुधीर मुनगंटीवार यांच्या योगदानाचे कौतुक केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पोंभुर्णा येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात बोलताना राज्यपालांनी हे वक्तव्य केले. यावेळी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांनी आदिवासी विद्यापीठाबाबत सांगितले की, या विद्यापीठात वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आणि व्यवस्थापन शिक्षणासह 80 टक्के जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. या विद्यापीठामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाबरोबरच, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध सरकारी योजनांचे लाभ देण्यात आले. यामध्ये सामुदायिक वनहक्क आणि वैयक्तिक वनहक्क प्रमाणपत्रांचे वितरण, आदिवासी स्वयं-सहायता गटांचा सन्मान, आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समाविष्ट होते. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यपालांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि एम.आय.डी.सी. अंतर्गत तालुक्यात मोठी गुंतवणूक आणण्याच्या योजना जाहीर केल्या, ज्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील.
यावेळी विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी लाभार्थ्यांना धनादेश आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.