नाशिक रोड, प्रतिनिधी: जय भवानी रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री तुळजा भवानी मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. भवानी मंदिर देवस्थानतर्फे भाविकांसाठी खास तयारी करण्यात आली आहे, आणि नवरात्रोत्सवात मंदिर चोवीस तास खुले राहणार आहे, अशी माहिती विश्वस्तांनी दिली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नवरात्रोत्सवाची सुरुवात ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये देवीची घटस्थापना आणि धार्मिक विधी पार पडतील. दसऱ्यापर्यंत म्हणजेच १२ ऑक्टोबरपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे तीन वाजता चरण तीर्थ, त्यानंतर अभिषेक व महापूजा होणार आहे. तसेच, पहाटे साडेपाच वाजता महाआरती होईल आणि दुपारी देवीला मध्यान भोग अर्पण केला जाईल. सायंकाळी आठला महाआरती आणि रात्री दहा ते साडेदहा दरम्यान प्रक्षाळ पूजा होणार आहे. नियमितपणे दुर्गा सप्तशती पाठ पठण दुपारी एक ते तीन या वेळेत होईल.
मंदिरातील नवरात्र उत्सवातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये ३ ऑक्टोबरला देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, ७ ऑक्टोबरला ललिता पंचमी महापूजा, ११ ऑक्टोबरला दुर्गाष्टमी आणि महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा, तसेच १२ ऑक्टोबरला विजया दशमी उत्सव आणि सायंकाळी पालखी मिरवणुकीचा समावेश आहे.मंदिर संस्थानने भाविकांसाठी मंदिर परिसरात अनेक विकासात्मक कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी भाविकांनी सढळ हस्ते मदत करावी आणि नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.