नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. १) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साधू-महंतांच्या १३ आखाडाप्रमुखांची बैठक होणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आखाडाप्रमुखांच्या बैठकीत सिंहस्थ पर्वस्नानांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. याचबरोबर सिंहस्थ कामांचा आढावादेखील या बैठकीत घेतला जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला आता जेमतेम दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिल्याने किमान या दौऱ्यात तरी मुख्यमंत्री सिंहस्थ निधीची घोषणा करतात का, याकडे महापालिकेसह सर्व शासकीय यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेचा १५ हजार कोटींचा, तर इतर यंत्रणांचा नऊ हजार कोटी असा एकूण २४ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वारसाठी हजारो कोटींचा सिंहस्थ निधी देणाऱ्या केंद्र सरकारने नाशिकच्या सिंहस्थासाठी अद्याप छदामही दिलेले नाही. राज्य शासनाकडूनही केवळ बैठकांवर बैठका सुरू आहे. त्यामुळे सिंहस्थ कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. शिल्लक कालावधी लक्षात घेता सिंहस्थांतर्गत रिंगरोड, मोठे पूल यासारखी कामे होणेही आता दुरापास्त बनले आहे. मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची घोषणा केली; परंतु अद्याप प्राधिकरणाची यंत्रणा स्थापित होऊ शकलेली नाही. त्यामुळे साधू-महंतांकडून आता शासनाविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरले असून, त्यांनी आता थेट साधू-महंतासह आखाडा प्रमुखांशी चर्चा सुरू केली आहे. साधू-महंतांशी चर्चा करून सिंहस्थ शाहीस्नानाच्या तारखा घोषित करण्यासाठी फडणवीस १ जून रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील स्थायी समितीच्या सभागृहात ही बैठक पार पडणार आहे.”
या बैठकीस अखिल भारतीय आखाडा परिषदेतील १३ आखाड्यांचे प्रत्येकी दोन असे २६ प्रतिनिधी, तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधू, महंत आणि पुरोहित संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सिंहस्थ तयारीचाही आढावा फडणवीस घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे.
पालकमंत्र्यांअभावी नियोजन रखडले?
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची नियुक्ती रखडल्यामुळे कुंभमेळ्याच्या नियोजनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. सिंहस्थ कामांसाठी २४ हजार कोटींचा आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. परंतु, या आराखड्यास अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही. केवळ तोंडी सूचना देण्यात आल्याने निविदा प्रक्रियेपलीकडे महापालिका प्रशासनाने कुठलेही काम सुरू केलेले नाही.