CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेडमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

cm-eknath-shinde-nanded-vikas-bhumipujan

Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. हे कार्यक्रम आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात घेण्यात आले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या मुख्य कार्यक्रमानंतर या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण, हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, आणि नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी हनुमान गड परिसरातील “राजमाता जिजाऊ सृष्टी”चे लोकार्पण केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाची इमारत, वाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे भूमिपूजन, तसेच परिचारिका वसतिगृहाचे भूमिपूजन यांचा समावेश होता. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक, लेबर कॉलनीतील पाणी पुरवठा सक्षमीकरण, आणि शेतकरी चौक तरोडा नाका येथील रस्त्यांच्या सुधारणांचे कामांचेही भूमिपूजन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी या सर्व कामांचा आढावा घेतला आणि येणाऱ्या काळात नांदेडच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे सांगितले.