Nashik – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने, नाशिक शहरातील परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी कट्टा, एक घातक हत्यार, १५ देशी दारूच्या बाटल्या, तसेच दोन तडीपार गुन्हेगारांची धरपकड केली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमंडळ-२ मध्ये कडक कारवाईचे आदेश दिले होते. यानुसार, परिमंडळ-२ चे पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड आणि नाशिकरोड विभाग, तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे निर्देश दिले.

कोम्बिंग ऑपरेशनची कारवाई: १. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी – एकूण २०६ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली व त्यांच्या चौकशी फॉर्म भरून घेण्यात आले. हत्यार जप्ती – उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रजीत वाघ याच्या ताब्यात एक गावठी पिस्टल आढळून आले, त्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम पवार याच्या ताब्यात कोयता आढळून आल्याने हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मोरेमळा परिसरात सुनिल जाधव याच्या ताब्यात १५ देशी दारूच्या बाटल्या सापडल्याने त्याच्यावर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
नितीन बनकर आणि उमेश गायधनी हे तडीपार गुन्हेगार निर्बंधित क्षेत्रात सापडल्याने त्यांच्या विरोधात मपोका कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ जणांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. टवाळखोरांवर कारवाई – १४३ जणांवर मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. समन्स आणि वॉरंट बजावणी – ३३ समन्स आणि १३ वॉरंटची बजावणी करण्यात आली.वाहन कायद्यानुसार कारवाई – ११३ जणांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

ही कारवाई विधानसभा निवडणुकीच्या काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असून, भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.