छत्रपती संभाजी नगर येथे मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. बैठकीत जागावाटपावर सखोल चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात असून, जवळपास एक तास या विषयावर चर्चा करण्यात आली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
बैठकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची स्वतंत्र बैठक घेण्यात आली, त्यानंतर महायुतीची बैठक झाली. या महायुतीमध्ये भाजप, शिवसेनेचे शिंदे गट, आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. यामध्ये पक्षांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली. भाजपला १५५ जागा, शिंदे गटाला ७५ जागा आणि अजित पवार गटाला ५५ जागा देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “जागावाटपाबाबत महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. सर्व चर्चा समोपचाराने होत आहेत. अंतिम जागावाटप ठरल्यावर आम्ही कोणत्या जागा निवडणार हे जाहीर करू.”
अमित शाह यांच्या या दौऱ्याचा उद्देश आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणे आहे. मंगळवारी त्यांनी नागपूर, संध्याकाळी छत्रपती संभाजी नगर आणि बुधवारी नाशिक व कोल्हापूर येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि कोल्हापूर विभागातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या धोरणांची आखणी करण्यासाठी ही बैठकी महत्त्वाची ठरली आहे.
भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे, मात्र आतापर्यंतच्या चर्चेत पक्षांमध्ये समन्वय आणि सामंजस्य दिसत आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये युतीच्या विजयासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.