धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा
Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा (Dhananjay Munde Resignation) दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला असून, या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
छगन भुजबळ यांना संधी मिळणार?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर (Dhananjay Munde Resignation) त्यांच्या रिक्त जागी माजी मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत भाजपकडून अटी घालण्यात आल्याचेही समजते.
भुजबळ यांना कोणत्या अटी घालण्यात आल्या?
भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री पद मिळणार नाही तसेच आगामी कुंभमेळा तयारीत हस्तक्षेप न करण्याची अट भाजपकडून घालण्यात आली आहे. जर भुजबळ यांनी या अटी मान्य केल्या, तर त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला कोणतीही अडचण राहणार नाही, असे सांगितले जात आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे कारण
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांना संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्याचबरोबर संतोष देशमुख यांना मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बीडमध्ये संतप्त नागरिकांनी बंद पुकारला होता. या वाढत्या दबावामुळे अखेर मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
छगन भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात?
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश न केल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज होते. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले जाईल अशी चर्चा होती. मात्र, आता मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लावली जाण्याची शक्यता वाढली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.