Digilocker: डिजिटल कागदपत्रे ग्राह्य मानण्याचे आदेश: मुंबई वाहतूक पोलिसांना दिले निर्देश

डिजिटल कागदपत्रे ग्राह्य मानण्याचे आदेश: मुंबई वाहतूक पोलिसांना दिले निर्देश

मुंबई: डिजिलॉकर (digilocker) आणि एम परिवहन अॅपवरील डिजिटल कागदपत्रांना वैध मानण्याचे स्पष्ट आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. वाहनचालकांनी डिजिटल कागदपत्रे दाखवूनही कारवाई केल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी गुरुवारी लेखी आदेश जारी केले आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

यामुळे आता मुंबईतील वाहनचालकांना प्रत्यक्ष कागदपत्रे बाळगण्याची गरज राहणार नाही. ते डिजिलॉकर (digilocker) किंवा एम परिवहन अॅपचा वापर करून त्यांच्या वाहनाच्या कागदपत्रांची डिजिटल प्रत दाखवू शकतात.

केंद्र सरकारचे निर्देश
केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, विमा, आणि पीयूसी अशा कागदपत्रांच्या डिजिटल प्रती वैध मानण्याचे निर्देश दिले होते. माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ अंतर्गत डिजिटल कागदपत्रे वैध मानली जातात. यासंदर्भात सर्व राज्यांच्या वाहतूक विभागांना सूचना दिल्या होत्या.

पोलिस-वाहनचालक वाद टाळण्यासाठी उपाय
वाहतूक पोलिसांकडून डिजिटल कागदपत्रांना मान्यता नसल्यामुळे वाहनचालकांवर ई-चलनद्वारे कारवाई होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींचा विचार करून वाहतूक नियंत्रण कक्षालाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता वाहनचालक व पोलिसांमधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे.

डिजिलॉकर (digilocker) व एम परिवहन अॅपच्या मदतीने कागदपत्र सादर करण्याची सुविधा वाहनचालकांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.