भारतीय जनता पार्टीचे नाशिक पश्चिममधून उमेदवारी न मिळाल्यामुळे महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भाजपशी संबंधित असलेल्या पाटील यांच्यामुळे नाशिकच्या राजकारणात एक नवा राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा असताना ती मिळाली नाही, त्यामुळे पाटील यांनी पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली आणि नवा राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. मनसेने अद्याप या मतदारसंघात आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे राजकीय तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, दिनकर पाटील हे नाशिक पश्चिममधून मनसेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
आज दिनकर पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कूच केले असून, आजच त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा होणार आहे. पाटील यांचा मनसे प्रवेश नाशिकच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवू शकतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रवेश सोहळ्यामुळे नाशिक पश्चिममधील निवडणूक रंगतदार होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दिनकर पाटील हे एक अनुभवी राजकारणी असून, नाशिक महानगरपालिकेतील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना मोठा जनाधार आहे. त्यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो, तर मनसेसाठी एक नवा संधीचा धडा उघडू शकतो.