पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, महाराष्ट्रात या आजाराने बाधितांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. पुण्यात सध्या ६४ रुग्ण असल्याची माहिती महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
GBS बाधित रुग्णांसाठी मोफत उपचार
महानगर पालिकेने गरीब रुग्णांसाठी ‘शहरी गरीब योजना’ अंतर्गत मोफत उपचाराची व्यवस्था केली आहे. यासाठी कमला नेहरू रुग्णालयात १५ आयसीयू बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. विशेषतः गंभीर रुग्णांसाठी २०० इम्युनोग्लोबलिन इंजेक्शन्स खरेदी करून ती खासगी रुग्णालयांना पुरवली जातील. यामुळे उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
सध्याच्या परिस्थितीवर लक्ष
पालिकेकडून २५,५७८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, रुग्णालयांमध्ये उपचाराची गुणवत्ता तपासण्यासाठी चार सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आयुक्तांनी सांगितले.
संशोधन आणि नमुने तपासणी
आरोग्य विभागाने शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करून रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांची पाहणी केली आहे. पाण्याचे आणि रक्ताचे नमुने तपासले असता काही ठिकाणी कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळला आहे. पाण्याचे इतर नमुने सध्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत आहेत.
नागरिकांसाठी सूचना
पाण्याद्वारे संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी फक्त उकळलेले पाणी प्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.