नाशिक:नवरात्रोत्सवानिमित्त साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंग गड येथे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. पहिल्याच दिवशीपासून मोठ्या संख्येने भक्तगण गडावर दाखल झाले असून, त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने अतिरिक्त ३०० बससेवांचे नियोजन केले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत आणि कोजागिरी पौर्णिमा उत्सवासाठी या जादा बस सोडल्या जाणार आहेत. नाशिकमधील ठक्कर बाजार बस स्थानकावरून नाशिक-दिंडोरी-वणीमार्गे नांदुरी आणि तेथून सप्तश्रृंग गडापर्यंत या बससेवा चालू आहेत. याशिवाय मालेगाव, मनमाड, आणि सटाणा मार्गांवरूनही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी इगतपुरी ते घाटनदेवी या मार्गावर देखील बससेवा सुरू करण्यात आली आहे.