दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात आजपासून (गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४) शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. पहाटे ५ वाजता मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येईल. यानंतर, सकाळी ८ वाजता नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते श्री कालिका देवीची महापूजा आणि महाआरती संपन्न होणार आहे. सकाळी ९ वाजता मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याहस्ते महाआरती करण्यात येईल.
सायंकाळी ७ वाजता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते देवीची महापूजा आणि महाआरती होणार असल्याची माहिती श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली. या नवदिवसीय उत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रम आणि पूजा विधी होणार आहेत.
प्रतिवर्षाप्रमाणे, यंदाही देवीच्या भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८:३० वाजता सनई वादन आणि महिला मंडळाच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२ वाजता नैवेद्य आणि पूजा, तसेच दुपारी २ ते ४ या वेळेत महिला मंडळाचे सप्तशती पाठ होणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता मंगलवाद्याच्या गजरात महापूजा होणार आहे. रात्री ११:३० वाजता महाआरतीनंतर शृंगार आणि वस्त्रालंकार सोहळा पार पडणार आहे.
नवरात्रोत्सवाचा हा सोहळा १६ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न होईल. या उत्सवासाठी श्री कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर ट्रस्टने विशेष व्यवस्था केली आहे. भाविकांनी देवी मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया आणि सदस्य किशोर कोठावळे, आबासाहेब पवार, संतोष कोठावळे, विशाल पवार यांनी केले आहे.