दुबई, 23 फेब्रुवारी: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वात मोठा सामना—भारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pak —आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. क्रिकेट विश्वातील या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी चाहते उत्सुक असून, भारतीय संघाचा वरचष्मा असल्याचे संकेत आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भारत मजबूत, पाकिस्तान दबावाखाली
न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानवर मोठा दबाव आहे. पहिल्या सामन्यात कराचीत न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवानवर टीकेची झोड उठली आहे. याउलट, भारताने दमदार सुरुवात केली असून, शुभमन गिलच्या शतक आणि मोहम्मद शमीच्या घातक माऱ्याच्या जोरावर बांगलादेशला 6 गडी राखून पराभूत केले.
मोहम्मद हफीजचे खळबळजनक वक्तव्य
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हफीजने संघाच्या सध्याच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. त्याने सांगितले की, “जर पाकिस्तान रमजानपर्यंत टिकला, तर काही शक्यता असू शकतात.” त्याच्या या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावर्षी रमजान 28 फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने हफीजचा सूचक टोला संघाच्या कमकुवत स्थितीबद्दल होता.
दुबईतील ऐतिहासिक रेकॉर्ड कोणाच्या बाजूने?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत, त्यात पाकिस्तानने 3 तर भारताने 2 विजय मिळवले आहेत. मात्र, दुबईतील इतिहास पाहता भारताने येथे पाकिस्तानला दोनही वेळा सहज पराभूत केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही टीम इंडियाचा वरचष्मा असल्याचे दिसत आहे.
आजचा सामना पाकिस्तानसाठी करो या मरो!
जर भारताने आज पाकिस्तानला पराभूत केले, तर रिझवानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर फेकला जाईल. अशा परिस्थितीत, पाकिस्तानला केवळ चमत्कार किंवा नशिबाचीच गरज भासेल.
क्रिकेटप्रेमींना आज एका रोमांचक सामन्याची प्रतीक्षा आहे. भारत आपल्या विजयी लयीत कायम राहील की पाकिस्तान चमत्कार करेल? हे पाहणे उत्साहवर्धक ठरेल!