4o mini
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक रोड, प्रतिनिधी
जेलरोडच्या दुरुस्तीचे काम अखेर सुरु झाले आहे. नोट प्रेससमोर खडीकरण व डांबरीकरणाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत विविध पक्ष, संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नाशिक रोडच्या महत्वाच्या खराब रस्त्यांचे काम नवरात्रापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे महापालिकेचे विभागीय अभियंता निलेश साळी यांनी सांगितले.
जेलरोडच्या मॉडेल कॉलनी चौकात व शिवाजी नगर चौकात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. मॉडेल कॉलनी चौकात गतीरोधक टाकण्याची नागरिकांची मागणी आहे. त्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.
जेलरोडवर प्रेस, बॅंका, शाळा, महाविद्यालये आहेत. दररोज हजारो नागरिक ये जा करतात. सहा महिन्यांपूर्वी जलवाहिनीसह अन्य कामासाठी जेलरोड खोदण्यात आला होता. उन्हाळ्यात नागरिक, वाहनचालक, व्यावसायिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागला तर पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाण खड्डे पडल्याने वाहतूकीला अडथळे येत आहे. मनसेने खड्ड्यात फुले वाहून तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने बैलगाडी आणून आंदोलन केले होते. अखेर महापालिकेने या समस्याची दखल घेत डांबरीकरणाला सुरुवात केली आहे.
कोठारी कन्या शाळा ते इंगळे नगर सिग्नलपर्यंत प्रेससमोर पाणीपुरवठ्यासाठी जेल रोड खोदण्यात आला होता. या रस्त्यावर खडी टाकून डांबरीकरण सुरू झाले आहे. केला हायस्कूलच्या बाजूचा जेल रोडही दुरुस्त केला जाणार आहे. या बाजूचे खड्डे बुजवले जाणार आहेत. या कामानंतर बिटको चौकापासून जेल रोडच्या संत जर्नादन स्वामी दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले जाणार आहेत. नाशिक रोडचा वीर सावरकर उड्डाणपूल खड्ड्यांमुळे धोकादायक झाला आहे. दत्त मंदिर सिग्नल सिन्नरफाटा दरम्यानचे खड्डे बुजवले जाणार आहेत. विहीतगाव सिग्नल ते सौभाग्य नगर तसेच मालधक्का रोड, जयभवानी रोड आदी महत्वाचे रस्ते नवरात्राच्या आधी दुरूस्त केले जाणार असल्याचे निलेश साळी यांनी सांगितले.