Hindu Culture : प्रसिद्ध कृष्ण कथाकार परमपूज्य महंत मानसशास्त्री यांच्या सुमधुर व ज्ञानसंपन्न प्रवचनांनी कोटमगाव कन्हैया नगरी (नाशिक रोड) येथे सुरू असलेल्या श्रीमद महावाक्य निर्वचन निरोपण सोहळ्याला भक्तिमय रंग चढला आहे. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृष्णकथेचा आनंद घेत आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
“धर्म हा सर्वात सोपा आहे. तो शिकायचा असेल, तर माणुसकीचा धर्म समजून घ्या. त्याच्या पलीकडे कोणताही धर्म नाही,” असे मार्मिक विचार महंत मानसशास्त्री यांनी आजच्या प्रवचनात मांडले.
ते पुढे म्हणाले, “माणुसकी जपणारा, नीतिमत्ता पाळणारा, नियती समजणारा आणि संस्कार जपणारा तोच खऱ्या अर्थाने धार्मिक आहे. केवळ देवाला डोकं आपटून, फेऱ्या मारून कोणी धार्मिक बनत नाही. खरा धार्मिक तोच, ज्याच्या अंतःकरणात माणुसकी जिवंत आहे.”

त्यांनी समाजातील विविध कमतरतांकडे लक्ष वेधत सांगितले की, “धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि कर्मकांड वाढत आहेत. मात्र, प्रत्यक्ष जीवनात माणुसकीचा अभाव दिसतो. तर ती आपल्या वागण्यात आणि कृतिशील जीवनात असली पाहिजे.”
सध्या विवाह सोहळ्यांमध्ये दाखवली जाणारी प्री-वेडिंग सॉंग्स यामुळे आपल्या संस्कृतीचा मूलभूत ढाचा बदलतो आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे भविष्यातील पिढीवर नक्की कसे संस्कार होतील, हे चिंताजनक आहे.

याबाबत महंत मानसशास्त्र यांनी आजच्या कृष्ण कथा प्रवचनात भाष्य करताना सांगितले की, “आपल्या व्यक्तिगत जीवनातील गोष्टी मर्यादित ठेवाव्यात. त्या इतरांना दर्शवण्याची आवश्यकता नाही. हिंदू संस्कृती ही नेहमीच सात्त्विकता आणि आदर्श जीवनशैली यांचा पुरस्कार करणारी आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांमध्ये प्राचीन परंपरांचे पालन व्हावे आणि अतिरेकी दिखावा टाळावा,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, “आजच्या तरुण पिढीने भारतीय संस्कृतीतील सात्त्विकतेला प्राधान्य द्यावे. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. विवाह ही एक पवित्र संकल्पना असून ती केवळ दिखाव्यासाठी किंवा करमणुकीसाठी वापरली जाऊ नये.”
महंत मानसशास्त्र यांच्या या विचारांनी उपस्थित भाविकांमध्ये विचारमंथन घडवले. त्यांच्या मते, हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी समाजानेच जबाबदारी घ्यावी आणि योग्य त्या मर्यादांचे पालन करावे.
हा सोहळा प्रकाश घुगे व त्यांच्या परिवाराने आयोजित केला असून, संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैया नगरी येथे सुरू राहणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रवचन, कृष्ण कथा आणि भजनसंध्या यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.