Latest News : नाशिकः महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे याबाबत निर्बंध घालणे आवश्यक आहे.
त्यानुसार जिल्हादंडाधिकारी शर्मा यांनी मुंबई पोलिस अधिनियमानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधानुसार ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी सहा वाजेपूर्वी आणि रात्री दहानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरीता वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा. ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकी पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. सदरचे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे २५ नोव्हेंबर पर्यंत अमलात राहील.
या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.