Latest News: महाराष्ट्र सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पाच प्रमुख टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, खासकरून मुंबई आणि ठाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः दररोज प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय महत्वाचा ठरला आहे, कारण आता त्यांना रोजच्या टोलभरण्यातून मुक्ती मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या टोलनाक्यांवर टोल भरण्याकरिता वाहनचालकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या, त्यामुळे त्यांना यापासून मोकळीक मिळणे ही एक मोठी सुविधा ठरणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अविनाश जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे. जाधव यांनी ठाणे आणि मुंबईकरांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “गेल्या २० वर्षांपासून आम्ही टोल भरत आलो आहोत, आणि आज अखेर या त्रासातून सुटका झाली आहे.”
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर सातत्याने सरकारवर दबाव आणला होता. याविषयी बोलताना जाधव म्हणाले, “राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली, ज्यामध्ये लाठीमार, कोर्टात खटले, तसेच उपोषणाचा मार्गही स्वीकारला गेला. राज ठाकरे यांनी चार वेळा थेट टोलनाक्यांवर जाऊन हा प्रश्न उचलला. या पाठपुराव्यामुळेच आज आम्हाला टोलमाफी मिळालेली आहे.”
जाधव यांनी सरकारला सावध करत सांगितले की, “हा निर्णय फक्त निवडणुकीपुरता नसेल, आणि निवडणुका झाल्यानंतर हा निर्णय मागे घेतला जाऊ नये. अन्यथा महाराष्ट्र सैनिकांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल.” त्यांनी सरकारला विनंती केली की हा निर्णय कायम ठेवावा, जेणेकरून नागरिकांना दीर्घकालीन दिलासा मिळेल.
यापूर्वी, मनसेने अनेक वेळा टोलनाक्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. अविनाश जाधव यांनीही वर्षभरापूर्वी मुलुंड टोलनाका बंद व्हावा यासाठी उपोषण केले होते, त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. याबाबतची चर्चा झाल्यानंतर आज अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. जाधव यांनी सांगितले की, “आम्हाला खात्री होती की काहीतरी सकारात्मक निर्णय होणार आहे आणि आज आम्ही त्याचा अनुभव घेत आहोत.”
या निर्णयामुळे ठाणे आणि मुंबईतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र त्याबाबत राजकारण होऊ नये अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे.