गट-अ आणि गट-ब साठी नियुक्त्या जारी
MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्यसेवा परीक्षेतील गट-अ आणि गट-ब संवर्गातील 498 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. या यशस्वी उमेदवारांची प्रशासकीय कारणास्तव रखडलेली नियुक्ती अखेर झाली असून, लवकरच हे उमेदवार पदभार स्वीकारतील.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राज्यसेवा परीक्षा-2022 च्या निकालानुसार नियुक्त्या
गट-अ मध्ये 229 अधिकाऱ्यांची निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा-2022 च्या अंतिम निकालानुसार गट-अ संवर्गात 244 उमेदवारांची शिफारस केली होती. त्यापैकी 229 उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी, जात वैधता प्रमाणपत्र तपासणी यासारख्या सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती आदेश जारी करण्यात आला आहे. उर्वरित 9 उमेदवारांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
गट-ब मध्ये 269 अधिकाऱ्यांची निवड
राज्यसेवा परीक्षा-2022 च्या अंतिम निकालानुसार गट-ब संवर्गात 370 उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी 269 उमेदवारांची सर्व आवश्यक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती प्रक्रिया पार पडली आहे. उर्वरित 63 उमेदवारांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
नियुक्त अधिकाऱ्यांचे पद आणि जबाबदाऱ्या
निवड झालेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक गट अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी या पदांसाठी करण्यात आली आहे.
प्रशिक्षण आणि रुजू होण्याचा कार्यक्रम
नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना 02 एप्रिल 2025 पासून दोन वर्षांच्या संयुक्त परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (CPTP-10) अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- गट-अ चे अधिकारी: यशदा, पुणे येथे प्रशिक्षण
- गट-ब चे अधिकारी: वनामती, नागपूर येथे प्रशिक्षण
सर्व उमेदवारांनी 02 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या ठिकाणी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “हे उमेदवार महाराष्ट्राच्या प्रशासनाचा कणा बनतील आणि नागरिकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करतील.” प्रशासनात नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडून उत्तम कार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.