मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या हालचाली सुरु असून, मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय अंतिम असल्याचे सांगत भाजपच्या उमेदवाराला संपूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपकडे मुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Mahayuti: तीन पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक
आज दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतील नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नियुक्तीसंदर्भात अधिक स्पष्टता येईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला जाणार असून, युतीतील पुढील राजकीय समीकरणे बैठकीत ठरवली जातील.
शिंदेंची भूमिका स्पष्ट
पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे ठामपणे सांगितले. “मुख्यमंत्रिपदासाठी भाजप जो उमेदवार देईल, त्याला माझा आणि शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. याबाबत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांचा निर्णय अंतिम असेल,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांची शक्यता बळावली
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्रबळ असल्याचे सूत्रांकडून समजते. सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची मागणी जोर धरत आहे. नागपुरात बोलताना फडणवीस म्हणाले, “महायुतीतील (mahayuti) सर्व निर्णय एकत्रितपणे घेण्यात येतील. कोणत्याही नेत्यांमध्ये मतभेद नाहीत.”
महायुतीत (Mahayuti) एकतेचे दाखले
महायुतीतील (Mahayuti) मतभेदांची चर्चा सुरु असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. “शिंदे हे कणखर नेते असून, त्यांच्यामुळे महायुती अधिक बळकट झाली आहे. त्यांच्या वक्तव्याने विरोधकांच्या अपप्रचाराला चोख उत्तर दिले आहे,” असे बावनकुळे म्हणाले.
अजित पवारांची भूमिका
अजित पवार यांनीही युतीच्या (Mahayuti) निर्णयास पाठिंबा असल्याचे सांगितले. “गुरुवारी दिल्लीत तीन पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असे नवे सरकार स्थापन होईल,” असे पवार यांनी सांगितले.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी ऐनवेळी वेगळा निर्णय होणार का, अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. मात्र, भाजपच्या दिल्लीतील एका ज्येष्ठ नेत्याने कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर होईल, असे स्पष्ट केले आहे.
सत्तास्थापनेसाठी उत्सुकता शिगेला
राजकीय वर्तुळात सध्या महायुतीतील (Mahayuti) आगामी निर्णयाविषयी उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीतील उपस्थिती आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत पुढील मार्ग निश्चित होईल. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावर पडदा उठण्याची प्रतीक्षा आता संपत आहे.
हे पण वाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार मोहन फड यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली