नागपूर: वंदे भारत एक्स्प्रेस ही अतिशय कमी वेळात लोकप्रिय झालेली ट्रेन असून, आता नागपूर-सिकंदराबाद मार्गावरही सुरू झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील तीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचे उद्घाटन केले. या गाड्यांमध्ये नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी, आणि कोल्हापूर-पुणे या मार्गांचा समावेश आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून रवाना झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बोलताना म्हटले की, “नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसची मोठ्या प्रमाणात मागणी होती. वंदे भारत ही अत्यंत लोकप्रिय ट्रेन असून, तिचा नागपूरकरांना मोठा लाभ होईल.”
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात गडकरींसोबतच्या २५ वर्षांच्या ऋणानुबंधांची आठवण काढली आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणे हा एक महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे सांगितले. “नागपूर हे देशाच्या मध्यभागी स्थित असून, दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढणे आवश्यक होते. यामुळे भारताच्या विविध प्रवास सुविधांमध्ये सुधारणा होईल,” असे त्यांनी नमूद केले.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या या नवीन सेवेमुळे नागपूरकरांचे प्रवास अधिक आरामदायक आणि वेळेवर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.