उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज रामदेवबाबा विद्यापीठात डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण आणि लोकार्पण केले. या खास समारंभात उपराष्ट्रपतींनी भारताच्या तंत्रज्ञानातल्या प्रगतीला गौरविले आणि लोकशाहीच्या भविष्यवाणीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या महत्वावर भाष्य केले.
समारंभात उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, चान्सलर डॉ. एस. एस. मंथा, कुलगुरू डॉ. आर. एस. पांडे आणि सचिव राजेंद्र पुरोहित यांचा समावेश होता.
उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात भारताला एकेकाळी स्लिपिंग जायंट म्हणून ओळखले जात असे, असे सांगितले आणि त्या पार्श्वभूमीवर आज भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आव्हाने आणि संधी निर्माण होत असतात, आणि या आव्हानांना संधीमध्ये रुपांतरित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहभाग घ्या, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे आणि जगातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा प्राप्त केला आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचारावर अंकुश बसला असून, शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या नवनवीन संधींचा उल्लेख केला आणि खेड्यांमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापराच्या महत्वावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून, रामदेवबाबा महाविद्यालयातून येणारे विद्यार्थी देशाच्या प्रगतीसाठी मोलाचा हातभार लावतील, असा विश्वास व्यक्त केला.
माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी रामदेवबाबा महाविद्यालयाच्या प्रारंभापासून ते विद्यापीठाच्या दर्जा प्राप्त करण्यापर्यंतचा प्रवास सांगितला आणि येथे ३०० उच्च गुणवत्ताधारक प्राध्यापकांची उपस्थिती यावर अभिमान व्यक्त केला. त्यांनी महात्मा गांधींच्या साध्या जीवनाच्या शिकवणीच्या महत्वावर जोर दिला.
समारंभाच्या प्रारंभात उपराष्ट्रपतींनी आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांनी ‘एक पेड मन के नाम’ अभियानांतर्गत विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण केले. मान्यवरांनी रामदेवबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.