नाशिकरोड येथील साई गणेश देवरे यांनी यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या घरात एका सुंदर गावाचा देखावा साकारला आहे, साई यांचा हा देखावा ग्रामीण जीवनाचं जिवंत प्रतिबिंब दाखवतो. शेतकऱ्यांच्या दिवसभराच्या कष्टाचं चित्रण यात दिसतं, जिथं शेतकरी शेतामध्ये काम करत आहेत, आणि गणपती बाप्पा बैलगाडीवर विराजमान झाले आहेत.साईने आपल्या या कलाकृतीचं नाव ‘गणेश मळा’ असं ठेवलं आहे. या देखाव्यात शेतं, विहीर, तलाव, नदी, बैल, घरासमोरील तुळशी वृंदावन, आणि गावातील पारंपारिक जीवनशैलीचं अत्यंत सुंदरपणे चित्रण करण्यात आलं आहे. शेतकऱ्याचं जीवन, त्यांच्या कष्टाची महती, आणि गावात उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव, हे सर्व या देखाव्यातून प्रभावीपणे मांडलं गेलं आहे.संपूर्ण गावाच्या वातावरणात झाडं, फुलं, आणि खेड्याचं नैसर्गिक सौंदर्य आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. या देखाव्यामुळे ग्रामीण संस्कृतीचं महत्त्व आणि तिचा अभिमान अधोरेखित होत आहे. साईने आपल्या या अनोख्या प्रयत्नातून शहरात राहणाऱ्या युवकांनीही आपल्या गावांचं, परंपरांचं आणि संस्कृतीचं जतन करावं, असं संदेश दिला आहे.या देखाव्याची विशेषता म्हणजे यात सादर केलेलं खेड्यातील साधं, पण आनंदी जीवन. साईच्या या देखाव्याचं परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, हा अनोखा गणेशोत्सव आकर्षणाचं केंद्र ठरला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.