कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची घोषणा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी आवश्यक तांत्रिक अडचणी आणि केवायसी (KYC) प्रक्रियेच्या अडथळ्यांवर काम करून त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, केंद्र शासनाच्या सूचनांनुसार सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याची सूचना त्यांनी केली आहे.मुंबईत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांवर चर्चा केली. 2023 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपये (जास्तीत जास्त 2 हेक्टर) अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे 83 लाख शेतकऱ्यांना 4194 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे.सध्या राज्यातील 96.17 लाख कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांपैकी 36 लाख शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची पडताळणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश कृषिमंत्री मुंडे यांनी दिले आहेत.यावर्षी राज्यात सोयाबीनचे 73.27 लाख मेट्रिक टन बंपर उत्पादन अपेक्षित आहे, आणि केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव जाहीर केला आहे. राज्य सरकारने सोयाबीन खरेदी केंद्रे उभारण्याचे काम गतीने पूर्ण करण्याची सूचना दिली असून, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.