Latest News :नाशिक: विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २२ ते २९ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने कडक नियमावली जाहीर केली असून अर्ज दाखल करण्यासाठी येताना उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी या नियमांविषयी माहिती दिली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
२२ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबतची अधिसूचना संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या सोबत फक्त चार व्यक्तींना कार्यालयात नेण्याची मुभा असेल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहनेच आणता येणार आहेत. यासाठी पोलीस अधिकारी शंभर मीटरच्या परिघाची निशाणी आधीच करणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे आणि पोलीस विभागाकडून सहायक आयुक्त आणि उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करताना या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
शर्मा यांनी उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी या सूचनांची नोंद घेऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.