नाशिकरोड (Nashik Crime News) : नाशिक शहरात एक धक्कादायक व हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस अंमलदाराने (Swapnil Deepak Gaikwad) आपल्या सहा वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवलं. ही घटना मंगळवारी (२४ जून २०२५) सायंकाळी ६.३० च्या सुमारास नाशिकरोड येथील योगमहाल अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik Crime News – कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल?
माहितीनुसार, पोलिस कर्मचारी स्वप्निल गायकवाड (वय ३४, रा. जेलरोड) यांनी काही दिवसांपूर्वी पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर मुलीचा ताबा त्यांच्या कडे होता. कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर – भावांचंही दुःखद निधन
ही दुर्दैवी घटना आणखी वेदनादायक ठरते कारण स्वप्निल गायकवाड यांचे दोन भावदेखील काळाच्या पडद्याआड गेले आहेत. एकाचा काही वर्षांपूर्वी गंभीर आजाराने मृत्यू झाला होता, तर दुसऱ्या भावाने पाच वर्षांपूर्वी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आता स्वप्निल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वृद्ध आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना नाशिक शहरातील पोलिस यंत्रणेसाठी आणि समाजासाठी एक मोठा धक्का आहे. मानसिक आरोग्य आणि कुटुंबातील तणाव हे गंभीर विषय असून, वेळेत संवाद आणि समुपदेशनाची गरज अधोरेखित करते.