Nashik Dam Water Storage Update | पालखेड धरणात 56% तर करंजवणमध्ये 31% जलसाठा; संततधारेमुळे दिंडोरी तालुक्यात पाणीपातळीत मोठी भर

Nashik Dam Water Storage Update | 56% water storage in Palkhed dam and 31% in Karanjavan; Large increase in water level in Dindori taluka due to continuous flow

जलसाठ्यात वाढ म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलासा • काही भागांत पेरण्या खोळंबल्या

दिंडोरी (नाशिक): Nashik Dam Water Storage Update – गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे जरी जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी धरणांमध्ये झालेली लक्षणीय जलसाठ्याची वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.

तालुक्यातील करंजवण, वाघाड, ओझरखेड, पालखेड, तिसगाव आणि पुणेगाव या प्रमुख धरणांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

प्रमुख धरणांचा सध्याचा जलसाठा (जून अखेर): (Nashik Dam Water Storage Update)

  • पालखेड धरण: ५६.६६%
  • करंजवण धरण: ३०.६७%
  • वाघाड धरण: ४०.४७%
  • ओझरखेड धरण: ३५.३०%
  • तिसगाव धरण: १८%
  • पुणेगाव धरण: ३८.५१%

करंजवण धरण, जे दिंडोरीसह येवला, निफाड व नांदगावसाठी अत्यंत महत्त्वाचे, ते आता ३०% पेक्षा अधिक भरले असून, वाघाड धरणाचा साठाही ४०% च्या वर गेला आहे.

ओझरखेड धरण, जे नाशिक व चांदवड तालुक्यांना पाणीपुरवठा करते, तेही समाधानकारक स्थितीत आहे.
मांजरपाडा वळण प्रकल्पातून अद्याप पाणीपुरवठा सुरू नाही, मात्र एकदा प्रवाह सुरू झाल्यास तिसगाव आणि ओझरखेड धरणांना मोठा फायदा होईल.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशा, पण… पेरण्या खोळंबल्या!

सततच्या पावसामुळे जरी जलसाठा समाधानकारक असला, तरी शेतीकामासाठी लागणारा योग्य हवामानाचा खंड मिळालेला नाही.
सोयाबीन, मका, उडीद, मूग, भुईमूग यांसारख्या खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या असून, भाजीपाला लागवडही लांबली आहे.
मे महिन्यापासूनच सुरू असलेल्या पावसामुळे मशागतीचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.