मध्यरात्री सुरू झालेल्या कारवाईदरम्यान तणाव, पोलिसांचा अश्रुधुराचा वापर
Nashik Darga Demolition News: नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत सातपीर दर्गा हटविण्याची Darga Demolition कारवाई प्रशासनाने मध्यरात्रीपासून सुरू केली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला असून जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत चार अधिकारी आणि 11 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
दर्गा हटविण्याची कारवाई कशी सुरू झाली?
धर्मगुरू आणि प्रशासनाची मध्यरात्री बैठक
प्रशासन, पोलीस आणि मुस्लिम धर्मगुरू यांच्या उपस्थितीत धार्मिक प्रक्रिया पार पडल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान ही कारवाई सुरू करण्यात आली.
जमावाचा विरोध आणि पोलिसांवर दगडफेक
दर्गा परिसरात अचानक मोठा जमाव जमा झाला. जमावाने पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि जमावाला पांगवले. यामध्ये काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अतिक्रमण हटविण्याची मोहीम पहाटे साडेपाचपासून सुरू
बुलडोझरच्या सहाय्याने 90% अनधिकृत बांधकाम हटवले
नाशिक महानगरपालिकेने पहाटे साडेपाचपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. युद्धपातळीवर काम सुरू असून सध्या 90 टक्के अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे. उर्वरित लोखंडी रचना हटवण्याचे काम सुरू आहे.
हिंदुत्ववादी संघटनांची मागणी, न्यायालयीन सुनावणी
काठे गल्ली परिसरातील दर्गा अनधिकृत असल्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ट्रस्टकडून कोणतेही वैध पुरावे सादर न केल्याने मनपाने ही दर्गा अनधिकृत ठरवत 15 दिवसांची नोटीस दिली होती.
परिसरात कडक पोलिस बंदोबस्त, वाहतूक वळवली
सध्या काठे गल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता असून वाहतूक पुढील तीन दिवसांसाठी इतर मार्गांनी वळवण्यात आली आहे. काठे गल्ली ते भाभा नगरमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तातही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.