फेक न्यूज व्हायरल करून जनक्षोभ भडकावण्याचा प्रयत्न, नाशिक सायबर पोलिसांची कारवाई
नाशिक : Nashik Fake News
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी तातडीने ‘हेल्पलाइन किसान’ नावाच्या यूट्यूब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या फेक न्यूजमुळे समाजात संभ्रम आणि जनक्षोभ पसरू शकण्याची शक्यता निर्माण झाली होती.
फेक व्हिडिओ व्हायरल; बनावट लोगो आणि अफवांची निर्मिती
शिवसेना (शिंदे गट) उपनेते अजय बोरस्ते यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली देताना, संबंधित यूट्यूब चॅनेलवर “छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन” असा बनावट मथळा वापरून व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये TV9 चा बनावट लोगो वापरून दिशाभूल करण्यात आली होती.
२४ तासात पोलिसांची दखल, सायबर सेलचा तपास सुरु (Nashik Fake News)
शहर आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे अंमलदार सुनील बहरवाल यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान हा व्हिडिओ सुमारे २ लाख लोकांनी पाहिला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे समाजात अफवा पसरवून शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला होता.
कायदेशीर कारवाई – आयटी अॅक्ट व ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा नोंद
नाशिक सायबर पोलिसांनी आयटी कायदा कलम 66(C), भारतीय दंड विधान 353(1), 345(3) तसेच भारतीय ट्रेडमार्क कायद्यानुसार कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
‘हेल्पलाइन किसान’ चॅनेलचे ४४७ व्हिडिओ आणि ३५ लाखांहून अधिक हिट्स
या चॅनेलवर मागील दोन वर्षांत 447 पेक्षा अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले असून एकूण 35 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. TV9 चा अधिकृत लोगो वापरून खोटी माहिती प्रसारित करण्यात आली, याचा सखोल तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात तपास
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके, तसेच सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.