त्र्यंबकेश्वर : श्री गोदावरी जन्मोत्सवानिमित्त येथील श्री शुल्क यजुःशाखीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या श्री गंगा गोदावरी मंदिर संस्थेतर्फे गुरुवार (ता. ३०) पासून ९ फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होत असून, कुशावर्तावरील गंगा गोदावरी मंदिरात सर्व कार्यक्रम होतील, असे मंदिराचे विश्वस्त व उत्सव समितीतर्फे कळविण्यात आले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गंगा दशहरा महोत्सवानिमित्त नित्य कार्यक्रमात सकाळी सात ते साडेनऊ दरम्यान श्री तीर्थराज कुशावर्तपूजन, श्री गंगा गोदावरीपूजन, श्री दुर्गा सप्तशती पाठ, शुक्ल यजुर्वेद पारायण आणि सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान आरती, मंत्रपुष्पांजली, शांतिपाठ होतील. या महोत्सवासाठी आर्थिक व अन्य स्वरूपाची मदत करू इच्छिणाऱ्यांनी संस्थेच्या कार्यालयात संपर्क करावा, असेही आयोजकांनी कळविले आहे. या महोत्सवांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमात दररोज सकाळी साडेआठला पुराणोक्त सुक्ताचे पठण श्री गंगा गोदावरी महिला मंडळातर्फे होईल.
महोत्सवातील कार्यक्रम असे
गुरुवारी (ता. ३०) सकाळी साडेआठला ‘स्थल शुद्धयर्थ उदकशांत’चे यजमान आशुतोष महाजन असतील. दुपारी साडेचारला ‘शोध ब्रह्मतत्त्वाचा’ यावर पंडित कौस्तुभशास्त्री पाटणकर यांचे प्रवचन होईल. हा कार्यक्रम श्री रमादेवीजी ट्रस्टतर्फे होईल. शुक्रवारी (ता. ३१) सकाळी साडेआठला अभिषेक ‘गंगा लहरी’च्या यजमान चैताली जोशी असतील. दुपारी साडेचारला ‘गुरू साक्षात परब्रह्म’ या विषयावर पंडित विनय ढेरगे यांचे प्रवचन होईल. हा कार्यक्रम पु. ना. गाडगीळ सराफतर्फे होईल.
शनिवारी (ता. १) सकाळी साडेआठला अभिषेक व गणपती अथर्वशीर्षाच्या यजमान स्मिता दीक्षित असतील. नऊला गणेश जयंतीनिमित्त यजमान रवींद्र चांदवडकर यांच्यातर्फे ‘गणेश याग’ होईल. रविवारी (ता. २) सकाळी साडेआठला अभिषेक गोदा महात्म्याच्या यजमान वेदिका पाटणकर असतील. दुपारी साडेचारला ‘आचारः प्रभवो धर्मः’ यावर पंडित मनोज ढेरगे यांचे प्रवचन होईल. सोमवारी (ता. ३) सकाळी साडेआठला अभिषेक ‘शिव महिम्न’च्या यजमान माधुरी देशमुख असतील.
दुपारी साडेचारला ‘श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व प्रभू रामचंद्र’ यावर शेखर गायधनी यांचे प्रवचन होईल. मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेआठला अभिषेक ललिता सहस्त्रनामाच्या यजमान रजनी शिखरे असतील. दुपारी साडेचारला ‘ईशावास्य इदं सर्वम्’ यावर पंडित जयेश वैद्य यांचे प्रवचन होईल.
बुधवारी (ता. ५) सकाळी साडेआठला अभिषेक ‘विष्णू सहस्रनाम’च्या यजमान सुप्रिया देवकुटे असतील. दुपारी साडेचारला ‘गंगा लहरी’ विषयावर पंडित रवींद्र अग्निहोत्री यांचे प्रवचन होईल.
गुरुवारी (ता. ६) सकाळी साडेआठला अभिषेक ‘श्रीसूक्त’च्या यजमान मयूरी हर्षल भुजंग असतील. दुपारी साडेचारला ‘गोदा माहात्म्य’ या विषयावर पंडित राजेश सुरेश दीक्षित यांचे प्रवचन होईल. शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेदहाला ‘श्री गंगा गोदावरी जन्मोत्सव’ यावर पंडित शेखरशास्त्री शुक्ल यांचे कीर्तन होईल. दुपारी साडेबाराला श्री गंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळा व सायंकाळी सहाला दीपोत्सव होईल.
नागरिकांनी कुशावर्त तीर्थावर दीप लावावेत, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यानंतर सव्वासहाला श्री कुशावर्त उत्तर काठपूजन व महाआरती आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते होईल. शनिवारी (ता. ८) सकाळी साडेआठला अभिषेक ‘श्रीमद् भगवद्गिता’च्या यजमान भारती सतीश वैद्य असतील. दुपारी चारला श्री गंगा गोदावरी पालखी सोहळा होईल.
या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, पालखी सोहळ्याप्रसंगी घरासमोर सडारांगोळी करावी, तसेच श्री गोदावरी मातेच्या पालखीवर पुष्पवृष्टी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रविवारी (ता. ९) सकाळी साडेआठला ‘प्रक्षालन पूजा’ च्या यजमान कीर्ती पाटणकर असतील.
त्यानंतर सकाळी अकराला नाशिकच्या ब्रह्मचैतन्य भजनी मंडळातर्फे भजन होईल. दुपारी बाराला महाप्रसादाने उत्सवाची सांगता होइल.