Nashik Historical Temple : अहील्याराम मंदिर – नाशिकच्या पंचवटीतील एक विस्मयकारक राममंदिर ”Sanctum of Serenity”

Nashik Historical Temple

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

इतिहासाची साक्ष देणारे मंदिर

Nashik Historical Temple : नाशिक हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ऐतिहासिक वारसासुद्धा लाभलेले शहर आहे. याच पंचवटी नगरीत एक गूढ, शांत आणि अतिशय देखणे मंदिर आहे – अहील्याराम मंदिर. इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी १७८६ साली या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. मंदिर एका खासगी वाड्यात असल्याने त्याचा कळस बाहेरून दिसत नाही – ही एक विशेष बाब!

स्थान आणि रचना (Nashik Historical Temple)

रामकुंडाजवळ थोड्याशा उंचीवर असलेले हे मंदिर दगडी पायर्यांनी चढून जाताना थोडीशी थकवा येतो, पण वरील सौंदर्य त्याच क्षणी विसरायला लावतो. सुंदर, झळाळता लाकडी दरवाजा पाहिल्यावरच मंदिराची देखभाल किती बारकाईने केली आहे याची जाणीव होते.

Nashik Historical Temple
Nashik Historical Temple

अनोखी श्रीराम मूर्ती

या मंदिरातली श्रीरामाची मूर्ती अतिशय खास आहे. संगमरवरी गोजिरवाणी मूर्ती, मोहक हास्याने सजलेला चेहरा आणि एक वेगळी मुद्रा – श्रीरामाचे दोन्ही हात सरळ खाली, एका हातात धनुष्य आणि दुसऱ्या हातात बाण. ही धनुर्धारी मूर्ती पारंपरिक स्वरूपापेक्षा वेगळी वाटते.

मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता या तिघांची शिसवी नक्षीकाम असलेली देव्हाऱ्यातील मूर्ती आहे. हेच डिझाईन काळाराम मंदिराच्या चांदीच्या मखरासाठीही प्रेरणास्थान ठरले होते.

अहिल्याबाईंची उपस्थिती आणि पवित्रतेचा अनुभव

श्रीरामाच्या पायाशी असलेल्या छोट्या कोनाड्यात अहिल्याबाई होळकरांची मूर्ती आहे, तर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमानाची मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या उंचीमुळे रस्त्यावरील गोंगाट इथे पोहोचत नाही. दुपारच्या निवांत वेळेस येथे येणारा प्रत्येकजण मंदिरातील शीतलता, शांतता आणि पावित्र्य अनुभवतो.

Ahilyabai Holkar Temples
Ahilyabai Holkar Temples

मंदिराचा सांभाळ आणि वारसा

क्षेमकल्याणी कुटुंबाच्या मालकीतील हे मंदिर काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहे. लाकडी खांब, ओवर्‍या, झोपाळा आणि खिडकीतून दिसणारा पंचवटी परिसर – हे सर्व वातावरण अधिक पवित्र आणि भारावलेले करते.

|| आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ||

|| लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ||

लेखक: सुनील शिरवाडकर | संकलन: मनाली गर्गे