नाशिक: प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचे कौतुक होत असताना, २०२६-२७ मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्यासाठी (kumbh mela ) केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचबरोबर, गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या निओ मेट्रो प्रकल्पालाही निधी न मिळाल्याने हा प्रकल्प आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
कुंभमेळ्यासाठी (kumbh mela) निधी शून्य, तर मेट्रोलाही ब्रेक
शनिवारी (दि. १) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र, त्यामध्ये नाशिक कुंभमेळ्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारच्या पातळीवर जोरदार तयारी सुरू असली तरी केंद्राकडून मदतीचा अभाव दिसत आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये कुंभमेळा (kumbh mela ) होणार आहे. यासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु, आर्थिक ताण टाळण्यासाठी या आराखड्यातील अनेक महत्त्वाची कामे वगळली जात आहेत. कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा अद्याप तयार नसल्याने तयारी अपूर्ण असल्याचे स्पष्ट होत आहे.
निओ मेट्रो प्रकल्प रखडला
नाशिकमध्ये २०२१ मध्ये निओ मेट्रोसाठी केंद्राने २१०० कोटींची तरतूद केली होती. मात्र, अद्याप प्रकल्पाचे भूमिपूजनही झालेले नाही. मध्यंतरी या प्रकल्पाला पर्याय शोधण्याचा विचार सुरू होता, परंतु त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
गोदावरी शुद्धीकरण आणि महत्त्वाच्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष
नाशिकच्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदीचे शुद्धीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. २०२० मध्ये तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी ‘नमामि गोदा’ प्रकल्प शासनाकडे सादर केला होता. त्याअंतर्गत १८२३ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
केंद्राकडून अपेक्षा फोल
मेट्रो, गोदावरी शुद्धीकरण आणि कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात तरतूद होण्याची अपेक्षा होती. मात्र, निधी न मिळाल्याने स्थानिक प्रशासन व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कुंभमेळ्यासारखा मोठा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.