नाशिकरोड – नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममधून प्रवाशाचा महागडा मोबाइल चोरणाऱ्या विधिसंघर्षित बालकाला अवघ्या चार तासांत पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले. चोरी गेलेला मोबाइलही हस्तगत करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
प्रवासी विजय रॉय (वय ३२, रा. गणेश चौक, नाशिक) हे बंगळुरूला जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकात थांबले होते. वेटिंग रूममध्ये त्यांच्या बॅगेत ठेवलेला मोबाइल एक अनोळखी व्यक्ती चोरून घेऊन गेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली होती.
प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन बनकर यांच्या आदेशावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे-पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. फुटेजच्या आधारे पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आणि घरच्यांना न सांगता स्टेशनवर आलेल्या अल्पवयीन मुलाची ओळख पटवली.
चार तासांच्या आत सदर विधिसंघर्षित मुलाला ताब्यात घेऊन चोरीचा मोबाइल हस्तगत करण्यात आला. या जलद कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.