काल (बुधवार) Uddhav Thackeray यांनी शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून (Shivsena UBT Party) हकालपट्टी केली होती. बडगुजर यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही कारवाई केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी सुधाकर बडगुजर यांच्या जागी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी निवड केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
दत्ता गायकवाड (Datta Gaikwad) हे ठाकरे गटाचे (Thackeray Group) माजी जिल्हाप्रमुख आहेत. तसेच त्यांच्याकडे नाशिक लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदाचा कार्यभार देखील होता. यानंतर आता त्यांची बढती करण्यात आली असून त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दत्ता गायकवाड यांना शिवसेनेचे निष्ठावन म्हणून ओळखले जाते. त्यांनी समीर भुजबळ यांच्याविरोधात नाशिक लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. गायकवाड यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मराठा महासंघातून झाली असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संघटक हे पद घेतले होते.
दत्ता गायकवाड हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आहेत. तसेच गेल्या ३० वर्षांपासून नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेवर त्यांच्या पॅनलची सत्ता असून, सध्या ते या बँकेचे चेअरमन आहेत. याशिवाय नागरी जिल्हा सहकारी बँकेचे देखील ते संचालक असून, त्यांचा सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. तसेच त्यांनी लोकसभा आणि विधानसभेचे समन्वयक म्हणून देखील काम केले आहे. यानंतर आज त्यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर माध्यमांशी बोलतांना म्हणाले होते की, “डी. जी. सूर्यवंशी यांना जिल्हाप्रमुख पद दिल्यापेक्षा विलास शिंदे यांना संधी दिली असती तर अधिक योग्य ठरले असते. मुख्यमंत्र्यांशी झालेली भेट कोणत्याही राजकीय हेतूने नव्हती, ती फक्त कामकाजाच्या अनुषंगाने होती. मी पक्षश्रेष्ठींवर अथवा स्थानिक नेतृत्वावर नाराज नाही. मी मंत्री गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा होतो, म्हणून Sanjay Raut यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी अरविंद सावंत देखील उपस्थित होते, मग त्यांच्याबाबत काय? असा सवालही बडगुजर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच सध्या मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. योग्य वेळी निर्णय घेईन आणि माध्यमांद्वारे तो जाहीर करेन,असेही बडगुजर यांनी स्पष्ट केले.