गुन्हा दाखल, दुसऱ्या दिवशी पक्षप्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
नाशिक | 3 जुलै 2025 – Nashik Politics Update – नाशिकच्या राजकारणात आज मोठा भूकंप घडला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते सुनील बागुल यांनी आपल्या पुत्रासह भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, फक्त एक दिवस आधी, म्हणजेच 2 जुलै रोजी बागुल यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी झालेला भाजप प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे.
मुंबईत भाजप कार्यालयात सकाळी पक्षप्रवेश
आज सकाळी १०:३० वाजता मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. बागुल यांच्यासोबत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सीमा ताजणे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे आणि कमलेश बोडके, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे एक माजी नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
गुन्हा दाखल आणि लगेच पक्षप्रवेश – राजकीय संदेश काय? (Nashik Politics Update)
सुनील बागुल यांच्याविरोधात नाशिक शहरात बुधवारी रात्री उशिरा दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू आहे. अनेक तर्कवितर्क आणि राजकीय संदेश यावरून चर्चेत आहेत.
ठाकरे गटाला मोठा धक्का, भाजपला फायदा
शिवसेनेत अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सुनील बागुल भाजपमध्ये गेल्याने ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुका लक्षात घेता, हा भाजपसाठी मोठा राजकीय प्लस मानला जात आहे.
गणेश गीतेंची ‘घरवापसी’ भाजपसाठी फायदेशीर
पूर्वी भाजपमध्ये कार्यरत असलेले आणि नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले गणेश गीते हेही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा नाशिकमध्ये मोठा जनसंपर्क असून, त्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे.