नाशिकरोड,२२ जानेवारी: नाशिकरोड रेल्वे स्टेशन Railway Station परिसरात बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. रेल्वे स्टेशन परिसरातील झेरॉक्स दुकानाजवळ संशयास्पद बॅग आढळल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. मात्र, ही वास्तविक घटना नसून प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेले मोकड्रिल (Mock Drill) असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
रेल्वे पोलिसांना संशयास्पद बॅग असल्याची माहिती मिळताच नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाला तातडीने सूचित करण्यात आले. काही वेळातच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेच्या उपस्थितीमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
बॉम्ब शोधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता श्वान ‘अल्फा’च्या मदतीने बॅगची तपासणी केली. प्राथमिक तपासणीदरम्यान बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे भासल्याने पोलिसांनी परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. काही वेळाने हा केवळ मोकड्रिल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या मोकड्रिलच्या माध्यमातून पोलिसांनी आपली तत्परता तपासली तसेच नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक जागरूकता निर्माण केली. भविष्यात कुठल्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोकड्रिलमध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित जगताप, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र माळी, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक हर्फुल यादव, गोपनीय विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश देवरे, जीआरपीचे ए.पी.आय अमोल देशमुख, बॉम्ब शोधक पथकाच्या निरीक्षक कीर्ती पाटील, पोलिस उपनिरीक्षक डी. बी. राणे, अग्निशमन दलाचे अधिकारी आर. एस. खरजुल, पी. जी. कर्डक, एस. एस. बोराडे, पी. एस. सोनवणे आणि अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी या सरावामुळे पोलिसांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले.