नाशिक प्रतिनिधी, : नवरात्र उत्सवाच्या भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका मातेच्या मंदिरात घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ झाला. अश्विनी चींगरे आणि महेश चींगरे यांच्या हस्ते भक्तिभावाने अभिषेक करून घटस्थापना पार पडली. रेणुका मातेच्या या पवित्र स्थळाचे राज्यभरात धार्मिक महत्त्व आहे. मंदिराच्या समोरील कुंडामध्ये रेणुका मातेची मूर्ती सापडल्यामुळे, या ठिकाणी त्यांची स्थापना करण्यात आली असून, भाविकांसाठी हे ठिकाण अत्यंत श्रद्धास्थान मानले जाते. 24 तास भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले असणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भक्तांच्या नवसाला पावणारी ही रेणुका मातेची ओळख असल्यामुळे संपूर्ण राज्यातून नवरात्र काळात भाविक येथे दर्शनासाठी येतात. पहिल्याच दिवशी मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली.नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस दररोज सकाळी पाच वाजता आणि सायंकाळी आठ वाजता आरती होणार आहे. या धार्मिक विधींचे आयोजन निरज चींगरे, नयन चींगरे, हर्षल चींगरे, आणि ओंकार चींगरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. चौथ्या माळेला भजन, हवन, आणि अष्टमीच्या दिवशी विशेष होम यांसारखे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच, भाविकांना पहाटे तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत मातेच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली 65 होमगार्ड, 20 अंमलदार, आणि पाच पोलीस अधिकारी मंदिर परिसरात तैनात आहेत. भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता यावे यासाठी ही सुरक्षा व्यवस्था अतिशय योग्य पद्धतीने हाताळली जात आहे.नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात खाऊ-खाद्य पदार्थ, खेळणी, आणि रहाट पाळण्यांच्या विविध दुकानांची मांडणी करण्यात आली आहे. या दुकानदारांनी परिसर सजवला असून, भाविकांना खरेदी आणि मनोरंजनाची संधी मिळत आहे. यामुळे मंदिर परिसरातील उत्साह दुप्पट झाला आहे.रेणुका मातेच्या मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता कामानिमित्त बंद आहे. त्यामुळे भाविकांना थोड्याशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या फक्त दुचाकी वाहनांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात असून, चारचाकी वाहनांसाठी रस्ता बंद आहे. भाविकांना या रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, जेणेकरून त्यांची सोय होईल.