Raj Thackeray, MNS, Maharashtra Assembly elections, Goregaon rally, Mahayuti, Mahavikas Aghadi, independent contest, political fight, upcoming elections, party manifesto
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Latest News : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून, यंदा राज्यात तिहेरी लढाई पाहायला मिळणार आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात लढत होणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात आगामी विधानसभा मनसे स्वतंत्र लढणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
राज ठाकरे यांची गोरेगावात शक्तीप्रदर्शन
राज ठाकरे यांनी गोरेगाव येथे आयोजित मेळाव्यात भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर टीका करत म्हटले, “मी पूर्वी म्हटले होते की शरद पवार नास्तिक आहेत. त्यांना देवधर्माशी काही देणेघेणे नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर पवार साहेब मंदिरात जाऊन पाया पडायला लागले आहेत, पण हे देखील खोटं आहे.” ठाकरे यांनी पुढे सांगितले की, निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष लोकांना जात, पैसा आणि इतर मुद्द्यांमध्ये अडकवतील, पण हे सर्व खोटं आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की, “निवडणुकीच्या काळात सर्व राजकीय पक्ष तुम्हाला पैसे वाटतील. ते नक्की घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला विजयी करा. महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आली की हा राज्य दिल्लीसमोर ना झुकणार ना तुटणार. आपला अभिमान आणि स्वाभिमान जपण्याचे काम मनसे करेल.”
विधानसभा निवडणुकीत मनसेची स्वतंत्र लढत
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “मनसे ना युतीत जाणार, ना महाविकास आघाडीत. आम्ही स्वतंत्रपणे महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरे जाऊ. विधानसभेच्या निकालानंतर मनसे हा सत्तेतील प्रमुख पक्ष असेल याची खात्री बाळगा.” ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “आचारसंहिता लागल्यानंतर प्रत्येक मनसैनिकाने जनतेच्या फसवणुकीवर लक्ष ठेवावे. आपणच या राज्याचा विकास करु शकतो.”
मनसेचा विकासाच्या दृष्टीने विचार
राज ठाकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी मनसेकडे ठोस योजना आहेत. त्यांनी नमूद केले की, “या राज्याची धुरा महाराष्ट्राने एकदा आमच्या हातात द्यावी, आम्ही महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवू.” त्यांचे भाषण महाराष्ट्राच्या सत्तेतील स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचा विचार मांडणारे होते.
निवडणुकीत तिहेरी लढाईची शक्यता
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत तिहेरी लढाईची शक्यता आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे हे तीन पक्ष मुख्य भूमिका बजावतील. या निवडणुकीत राज ठाकरे यांची मनसे सत्तेत येण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.