महाराष्ट्रातील पालकमंत्री नियुक्तीवरील गोंधळावर रोहित पवार Rohit Pawar यांनी मांडला अनोखा प्रस्ताव – प्रत्येक जिल्ह्यास तीन पालकमंत्री नेमून राजकीय समतोल साधण्याची सूचना.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक : राज्यातील पालकमंत्री नियुक्तीवरून सुरू असलेल्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी अनोखा प्रस्ताव मांडला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना, पालकमंत्री पदावरून होणाऱ्या वादंगावर बोलताना पवार म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यास तीन पालकमंत्री नेमले तर सगळ्यांचे समाधान होईल. यात तिन्ही पक्षांचा एक-एक मंत्री असावा, जेणेकरून विकासकामे व राजकीय समतोल राखता येईल.”
नाशिकसह रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या गोंधळावर रोहित पवार Rohit Pawar यांनी टिप्पणी केली. कुंभमेळा निधीवरून वाद होत असल्याचा दावाही त्यांनी केला. “सरकारने एकदा मंत्री नेमले आणि नंतर पदे काढून घेतली. अशा गोंधळामुळे जनतेला विकासाच्या आशा धूसर वाटत आहेत,” असे पवार म्हणाले.
यावर पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेली तीन पालकमंत्र्यांची कल्पना ऐकून उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली. “ही सूचना अंमलात आणली, तर कदाचित वाद संपतील आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सौहार्द निर्माण होईल,” असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
पवारांच्या या सूचनेला सरकारकडून किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पण सध्याच्या घडामोडींवरून तरी महाराष्ट्रातील राजकारण अजूनही नाट्यमय व अनाकलनीय असल्याचेच चित्र दिसत आहे.