नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. याठिकाणी आगामी निवडणुकीत माजी खासदार समीर भुजबळ निवडणूक लढवणार का, याबाबत बरीच चर्चा सुरु होती. मात्र, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना “नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे नेण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो,” अशा शब्दांत सदिच्छा व्यक्त केल्या. त्यामुळे समीर भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नांदगाव मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महायुतीकडून निवडणूक लढवणार आहेत, हे निश्चित झाले आहे. मात्र, समीर भुजबळ कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा ते अपक्ष म्हणून मैदानात उतरणार का, याबाबतचा निर्णय अद्याप बाकी आहे. गेल्या काही दिवसांपासून समीर भुजबळ यांची या मतदारसंघात वाढती सक्रियता लक्षात येते. जिल्हा परिषदेच्या विविध गटनिहाय कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात आपली उपस्थिती दर्शवली आहे. याशिवाय, त्यांनी अजय- अतुल यांचा नवरात्रोत्सवानिमित्त मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून जनतेशी थेट संपर्क साधला आहे.
समीर भुजबळ यांचे संभाव्य उमेदवारीवर चर्चेच्या दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांचे नावही चर्चेत आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. नांदगाव मतदारसंघात पूर्वी पंकज भुजबळ यांनी दोन वेळा विजय मिळवला आहे, मात्र मागील वेळेस त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे भुजबळ कुटुंबाचा या मतदारसंघातील दावा कायम राहील असे दिसत आहे, आणि समीर भुजबळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर समीर भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते
राजकारणात आहे, निवडणूक लढणारच. उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवू. जो काही निर्णय घ्यायचा असतो तो वरिष्ठ घेत असतात. शेवटी तिकीट मिळो किंवा नाही आम्हाला काम तर करावंच लागते ना. तयारी तर करावीच लागेल ना. उमेदवारी मिळाली तर लढू नाही मिळाली नाही लढणार.
या पार्श्वभूमीवर येवल्यात महायुतीकडून मंत्री छगन भुजबळांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे नांदगावमध्ये समीर भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.