Shikharewadi Police station : शिखरेवाडी-गंधर्व नगरीत कायमस्वरूपी पोलीस चौकीच्या मागणीसाठी नागरिकांचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांना साकडे

Police station Shikharewadi

नाशिकरोड परिसरातील शिखरेवाडी-गंधर्व नगरीत (Shikharewadi Police station) कायमस्वरूपी पोलीस चौकीची मागणी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक (प्रतिनिधी) : शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारी आणि वाहतूक समस्याही दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा सर्वाधिक फटका नाशिकरोड परिसराला बसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिखरेवाडी किंवा गंधर्व नगरी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Shikharewadi Police station)

गृहराज्यमंत्री योगेश कदम नाशिक दौऱ्यावर असताना रोहन देशपांडे यांनी त्यांना या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी गणेश कदम, विक्रम कदम, प्रशांत पाटील, संदीप कदम, विजय कदम, यश बच्छाव, लकी ढोकणे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. या बैठकीत गृहराज्यमंत्री कदम यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच, मराठी भाषेचा प्राचीन इतिहास विषद करणारी ‘उत्तुंग झेप’ दिनदर्शिका भेट देण्यात आली.

नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक २० हा एक महत्त्वाचा आणि मोठा प्रभाग असून, नोट प्रेस, न्यायालय, आयुक्त कार्यालय, अनेक शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संकुले येथे आहेत. २४ तास लोकांची वर्दळ असलेल्या या परिसरात वाहतूक कोंडी, अपघात आणि गुन्हेगारीच्या घटना सतत घडत असल्याने पोलिस चौकीची नितांत गरज आहे.

या भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यरत झाल्यास वाहतूक शिस्त, अपघात नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणामकारक नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ही मागणी गृह विभागाने सहानुभूतीपूर्वक विचारात घ्यावी आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.