
सिंधुदुर्गातील मालवन मधील राजकोट किल्यावरील उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे. हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता. त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट चबुतरा, तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता. हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता. त्यावेळी स्थानिकांनी बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पुतळ्यासाठी 5 कोटींची तरतूद केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भव्य समारंभात छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थापनासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाने तब्बल 5 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर राज्य सरकार व नौदल विभागाच्या परवानगीनंतर या पुतळ्याचे बांधकाम सुरू झाले होते. पण आता हा पुतळा पडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.