सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजन जलदगतीने करण्याचे आदेश
Simhastha Kumbh Mela 2027 : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन गतीमान करावे आणि लोकसहभागाला प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आढावा बैठक: कुंभमेळ्याच्या तयारीचा वेध
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा २०२७ संदर्भातील आढावा बैठकीत मंत्री महाजन यांनी विविध उपाययोजनांवर चर्चा केली. या वेळी आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळा: स्वच्छता आणि सुरक्षिततेवर भर
मंत्री महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा पावसाळ्यात होणार असल्याने भाविकांसाठी वाहनतळ, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन आवश्यक आहे. रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथे जागा मर्यादित असल्याने गर्दी व्यवस्थापनासाठी ठोस पावले उचलली जातील.
प्रमुख निर्णय आणि उपाययोजना (Simhastha Kumbh Mela 2027)
- प्रथम टप्प्यातील कामे दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करणे.
- कुंभमेळ्यासाठी निधीची व्यवस्था करून उच्च दर्जाची कामे गतीने पूर्ण करणे.
- वाहनतळ ठिकाणे निश्चित करणे व चिखलयुक्त जमिनीत वाहन अडकू नयेत यासाठी शाश्वत उपाययोजना.
- भाविकांच्या सोयीसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ५+ हेलिपॅड उभारणे.
- पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा विकास करण्याचे नियोजन.
- मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत गर्दी अधिक अपेक्षित असल्याने सुरक्षा यंत्रणांचे अधिक बळकटीकरण.
रामकुंड परिसराची पाहणी
यावेळी मंत्री महाजन यांनी रामकुंड, रामकालपथ, नारोशंकर मंदिर, काळाराम मंदिर, सीता गुंफा, तपोवन, गोदावरी संगम, नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसर यांची पाहणी केली.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७: दर आठवड्याला बैठक अनिवार्य
यापुढे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साप्ताहिक बैठकांचे आयोजन करण्यात येईल आणि प्रत्येक यंत्रणेला नियोजनासाठी निश्चित जबाबदारी दिली जाईल.
सिंहस्थ कुंभमेळा हा संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारा ऐतिहासिक उत्सव असल्याने तो अधिक सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.