नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा येथे खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दैवी अपघातात अनिल मिश्रा या युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास कसलीच ठोस कारवाई झालेली नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या दुर्घटनेनंतर, युवा सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. युवा सेना जिल्हाप्रमुख राहुल ताजमपुरे यांनी महापालिकेला इशारा दिला की, जर खड्डे तातडीने बुजवले गेले नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
राहुल ताजमपुरे म्हणाले, “महानगरपालिका वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करत आहे. नागरिकांच्या जीवाशी असा खेळ सहन केला जाणार नाही. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत आणि यामुळे होणारी जीवितहानी तात्काळ थांबवली पाहिजे.”
सिन्नर फाटा परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे तीव्र रोष आहे. या घटनेमुळे भविष्यात कोणताही निष्पाप बळी जाऊ नये, यासाठी महापालिकेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. युवा सेनेच्या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, महापालिका पुढील काही दिवसांत काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या वेळी युवा सेना जिल्हाप्रमुख राहुल अंबादास ताजमपुरे, महाराष्ट्र राज्य विस्तारक किरण डहाळे, उपमहानगर प्रमुख आकाश निकम, युवा सेना उपमहानगर प्रमुख अमोल जाधव, युवा सेना जिल्हा चिटणीस सचिन ताजमपुरे, बिपिन मोहिते, आणि प्रशांत पगारे हे उपस्थित होते.